समकालीन 'विषमकाला'ची चंदेरी बखर - मिडनाईट मॅटिनी
अमोल उदगीरकर हे नाव फेसबुक ब्लॉग्ज यासारख्या समाज माध्यमांमध्ये संचार असणाऱ्या मराठी सिनेरसिकांना नवं नाही. फेसबुकवरील अतिशय गाजलेली 'न- नायक' ही लेखमालिका अनेकांना आजही आठवत असेल, जी पुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. न-नायक पण वाट्याला आलेल्या काही कलाकारांचा जीवनपट यात चितारला होता. मराठीमध्ये अशा प्रकारचं लेखन याआधी फारसं झालं नव्हतं ती उणीव या लेखांनी काही प्रमाणात भरून काढली. उदगीरकर यांचंच दुसरं पुस्तक मिडनाईट मॅटिनी मार्च- २०२३ मध्ये रसिकांच्या भेटीला आलं आहे. या पुस्तकाचंही खूप चांगलं स्वागत झालं. सिनेमा या विषयाला वाहिलेल्या पण विस्तृत परीघ असलेल्या काही लेखांचं संकलन असं या पुस्तकाचं थोडक्यात स्वरूप आहे. हे लेख बव्हंशी मुक्त चिंतनात्मक आहेत. लेखकाच्या विचारांचं, धारणांचं लख्ख प्रतिबिंब या लेखांमध्ये पडलेलं दिसतं. यातल्या एका लेखात शिरीष कणेकर यांचं एक मार्मिक वाक्य उद्धृत केलं आहे - "बाहेरच्या उजेडात पाहण्यासारखं काही राहिलं नाही, तेंव्हा आमच्या मनातला काळोख आम्ही थिएटरातल्या काळोखात बेमालूमपणे मिसळून टाकला." सर्वसामान्य भारतीय सिनेरसिकांची सिनेमाबद्दलची भावना यापेक्षा फार काही निराळी असेल असं वाटत नाही.
यातील लेखांच्या विषयांचं वैविध्य समजण्यासाठी वानगी दाखल काही शीर्षके पुढीलप्रमाणे : "गिव्ह सम क्रेडिट टू 'क्रेडिट्'स", "चित्रपटगृहातली बदलती खाद्यसंस्कृती", "बायो'पीक' ", "हवीहवीशी सुमारांची सद्दी", "सायको सिनेमॅटिक्स अर्थात सिनेमाचं मानसशास्त्र", "नैराश्य, आऊटसाईडर्स आणि आत्महत्यांची वर्णव्यवस्था", "अनुराग 'डिसेंट' कश्यप, त्रिशंकू भवतालाचे संगीतकार, " 'एक देश एक सिनेमा' मृगजळ की वास्तव" इत्यादी.
'अंधाराचं वरदान' या पहिल्याच लेखात सिनेमागृहातला अंधार या विषयाचे इतके विविध पैलू उलगडून दाखवलेत की वाचताना आपण अचंबित होतो. 'हा अंधार tempting आणि comforting असतो' या वाक्याला तर मनोमन दाद जाते. श्रेय नामावली (ओपनिंग/क्लोजिंग क्रेडिट्स) या काहीशा दुर्लक्षित विषयावरचं भाष्य तर मुद्दाम वाचावं असं आहे. 'चित्रपटगृहातली बदलती खाद्य संस्कृती' या लेखातून सर्वांच्या जिव्हाळ्याच्या चित्रपटगृहातल्या (सिंगल स्क्रीन/मल्टिप्लेक्स) खानपान संस्कृतीचा आढावा घेतला आहे. ग्रामीण अथवा निमशहरी प्रेक्षक आणि मल्टिप्लेक्स संस्कृतीला सरावलेला शहरी प्रेक्षक यांच्या सिनेमागृहातल्या खानपानाविषयीची रोचक निरीक्षणं यात नोंदवली आहेत. 'पोस्टर्स आणि पोस्टरबाजी' या लेखातून सिनेमांचं पोस्टर हा महत्त्वाचा घटक कसा बदलत गेला याची अनेक उदाहरणं लेखकाने दिली आहेत. 'ओटीटी प्लॅटफॉर्म्स दशा आणि दिशा' हा लेख ओटीटी(ओव्हर दी टॉप) प्लॅटफॉर्म्स चा उदय, त्यांच्या स्थिरावण्यात कोविड महामारीचा वाटा, त्या मागचं अर्थशास्त्र, या क्षेत्रातले खेळाडू (कंटेंट प्रोव्हायडर्स या अर्थी), त्यातल्या विषयांचं वैविध्य आणि सेन्सॉरशिप अशा विस्तृत अंगांना स्पर्श करतो.
'बायो'पीक' ' या लेखातून बायोपिक्स अर्थात चरित्रपटांचा इतिहास, अधिकृत आणि अनधिकृत चरित्रपट, नैतिकतेच्या सापेक्ष कल्पना, अर्थकारण, मराठीतले बायोपिक्स आदी बाबींचा आढावा घेतला आहे. 'हवीहवीशी सुमारांची सद्दी' आणि 'तकिया कलाम - एक विलुप्त होत चाललेली कला' या लेखांमधून रंजनवादी, पलायनवादी असे शिक्के बसलेल्या आणि काहीशा तुच्छतेने ज्याकडे पाहिले जाते अशा तथाकथित लोकानुनयी, देमार किंवा 'ट्रॅशी' सिनेसंस्कृती बद्दल भरभरुन लिहिलं आहे. 'सायको सिनेमॅटिक्स अर्थात सिनेमाचं मानसशास्त्र' या छोटेखानी लेखातून मानसशास्त्रातल्या काही संकल्पना आणि त्यांचा सिनेमावर पडलेला प्रभाव यांचं विवेचन केलं आहे. 'नैराश्य, आऊटसाईडर्स आणि आत्महत्यांची वर्णव्यवस्था ' हा लेख अलिकडेच झालेला एका तरुण अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यु आणि त्या पश्चात सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेच्या अनुषंगाने मनोरंजन सृष्टीत घडणाऱ्या आत्महत्यांचा अतिशय व्यापक पट मांडतो. या विषयावर इतक्या आत्मियतेने अभावानेच लिहिलं गेलं असावं. 'व्ही फॉर व्हिक्टीम की व्ही फॉर व्हिक्टरी' या लेखात काही बंडखोर स्त्री अभिनेत्यांचा संघर्ष, त्यांच्या वाट्याला आलेली अवहेलना, कुप्रसिध्दी आणि यावर त्यांनी केलेली मात यांचा प्रेरक प्रवास मांडतो.
'अनुराग 'डिसेंट' कश्यप' हा लेख म्हणजे अनुराग कश्यप या हुशार, हरहुन्नरी पण व्यवस्थेला सतत प्रश्न विचारणाऱ्या अस्वस्थ कलाकाराला दिलेला 'ट्रिब्यूट' आहे. वाढत्या धृवीकरणाच्या सध्याच्या काळात अप्रिय वाटणाऱ्या विषयांवर थेटपणे व्यक्त होणाऱ्या देशातल्या मोजक्या लोकांपैकी एक असणाऱ्या अनुरागच्या सिनेमांचे (पटकथा/संवाद लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून) समकालीन घटनांबद्दलचे संदर्भ लेखकाने उलगडून दाखवले आहेत. या संग्रहातले माझ्या मते सर्वात जमलेले लेख म्हणजे 'जर हिंदी सिनेमासृष्टीत 'यु टीव्ही स्पॉट बॉय' नसतं तर...' आणि 'रंग दे तू मोहे गेरुआ' हे आहेत. यु टीव्ही स्पॉट बॉय या प्रॉडक्शन हाऊसने २००० च्या दशकाच्या उत्तरार्धात प्रयोगशील लेखक-दिग्दर्शकांना पाठबळ देऊन मुख्य प्रवाहातलेच पण सादरीकरणाचे अभिनव प्रयोग करणारे चित्रपट निर्माण केले. 'आमिर', 'उडान', 'देव डी', 'ओये लक्की लक्की ओये', 'पानसिंग तोमर', 'शाहिद' ही त्यातली काही ठळक नावे. या प्रयोगातून प्रस्थापित स्टार्सना टक्कर देणारी अभिनेत्यांची नवी फळी तयार झाली आणि प्रेक्षकांनाही सकस सिनेमांचा अनुभव मिळाला. अमिताभ भट्टाचार्य, वरुण ग्रोवर, इर्शाद कामिल, स्वानंद किरकिरे, कौसर मुनीर या तत्कालीन गीतकारांच्या नवीन पिढीने जागतिकीकरणा नंतरच्या काळातल्या बदलत्या अभिरुचीची दखल घेत जी क्रांती घडवली त्याचा लेखा जोखा 'रंग दे तू मोहे गेरुआ' या लेखात मांडला आहे. छोट्या शहरांतून आलेले हे गीतकार आणि अनुराग कश्यप, इम्तियाज अली, विशाल भारद्वाज, अभिषेक चौबे या लेखक/दिग्दर्शकांनी सिनेमा या माध्यमाला नवे आयाम दिले, साचलेपणा मोडून काढला, दुर्लक्षित राहिलेल्या 'हार्टलँड' ला आवाज मिळवून दिला. उपरोल्लेखित गीतकार आणि रहमान, विशाल शेखर, शंकर एहसान लॉय, प्रीतम, अमित त्रिवेदी या संगीतकारांनंतर चित्रपट संगीताचं भवितव्य काय असेल ही चिंता लेखकाला वाटते पण तो नवीन पिढीबद्दल आशावाद ही व्यक्त करतो. एकूणच हे दोन्ही लेख उत्कृष्ट जमलेले आहेत.
'तुंबाड: भय नावाच्या बेसिक इन्स्टिंक्टची गोष्ट' हा लेख राही अनिल बर्वे यांनी पाहिलेलं तुंबाड नावाचं स्वप्न आणि त्याचा केलेला अविश्वसनीय वाटावा असा पाठलाग यांचा प्रवास सांगतो. पुस्तकाचा ब्लर्ब बर्वे यांनीच लिहिला आहे. 'त्रिशंकू भवतालचे संगीतकार', 'शंकर एहसान लॉय: जागतिकीकरणानंतरच्या अस्वस्थ भारताचा सांगितिक आवाज', 'सत्यजित रे यांच्या मिश्किल चष्म्यातून दिसणारं 'अंधारयुग' ', हे लेखही माहितीपूर्ण आणि वाचनीय झालेत.
पुस्तकाला निखिलेश चित्रे यांची आस्वादक प्रस्तावना लाभली आहे. अन्वर हुसेन या ज्येष्ठ चित्रकार/ मुखपृष्ठकाराने पुस्तकाचं अप्रतिम मुखपृष्ठ साकारलंय, त्या मागे त्यांचा नेमका काय विचार होता हे पुस्तकाच्या शेवटी त्यांनी नमूद केलं आहे. समकालीन चित्रपटांच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक एक मोलाचा दस्तावेज ठरेल यात काही शंका नाही. देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची निर्मितीमुल्ये उत्तम आहेत हे आवर्जून सांगायला हवं.

पुस्तकाचे नाव : मिडनाईट मॅटिनी
लेखक: अमोल उदगीरकर
पृष्ठसंख्या: २०६
किंमत: ₹३५०
प्रकाशक: देशमुख आणि कंपनी

Comments